ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

0

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विद्या बाळ यांचा जन्म 12 जानेवारी 1937 रोजी झाला. त्यांनी 1958 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

तसेच महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये विद्याताई सक्रीय होत्या. लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विद्याताईंचं ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक अत्यंत गाजलं. विद्या बाळ यांना स्त्रियांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती. 1981 मध्ये त्यांनी ‘नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रुपांतरित कादंबरी लिहिली आहे.

विद्या बाळ यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून दोन वर्षे काम केलं. त्यानंतर, 1964 ते 1983 या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि 1983 ते 1986 या काळात मुख्य संपादक.  त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 1989 मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरु केले.

Leave A Reply

Your email address will not be published.