मुंबई: ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणदिवे यांच्या रूपानं ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ गमावल्याची भावना सामाजिक व पत्रकारिता वर्तुळात व्यक्त होत आहे.
नव्वदी पार केलेले दिनू रणदिवे हे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. वयोमानामुळं त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. असं असलं तरी त्यांचं काम सतत सुरू होतं. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व नव्या पिढीतील तरुणांचा त्यांच्या दादर येथील घरी सतत राबता असे. त्यांच्याशी ते अथक संवाद साधत. अनेकांना अभ्यासासाठी संदर्भ पुरवत. त्यांचे हे काम काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरू होते. महिनाभरापूर्वीच त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर रणदिवे यांचीही प्रकृती खालावली होती. त्यातून ते सावरले नाहीत.
डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ मध्ये जन्मलेल्या रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेआधी पत्रकारितेला सुरुवात केली. एका ध्येयानं पत्रकारितेत आलेल्या रणदिवे यांचा अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग राहिला होता. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामात ते सक्रिय होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावासही भोगला होता.