ज्ञान व धन दिल्याने वाढते – राधेशाम चांडक

0

रतनलालजी बाफना यांच्यातर्फे मल्हार हेल्प फेअर मधील

समाजसेवी संस्थांना मानपत्र व मदतराशीचे वितरण

जळगाव;- आपल्या जवळ असलेले ज्ञान व अधिरीक्त असलेले धन या दोन गोष्टी अशा आहेत ज्या इतरांना दिल्याने त्यामध्ये सतत वाढ होत राहते. मात्र नेमक्या या दोन गोष्टी देतांना फार कमी लोक दिसतात. आजचा हा कार्यक्रम म्हणजे या दोन गोष्टी देणार्‍या लोकांचा स्नेहमेळा आहे, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बन को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेशामजी चांडक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. ते रतनलालजी बाफना यांच्यातर्फे मल्हार हेल्प फेअर मधील सहभागी समाजसेवी संस्थांना मानपत्र व मदतराशी वितरणच्या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र, कुसुंबा येथील सुशील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, साहित्यिक सुभाषचंद्र भंडारी, जळगाव नगरीचे माजी महापौर नितीन लढ्ढा, दीपस्तंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन, समाजसेवक व शाकाहाराचे पुरस्कर्ते रतनलालजी बाफना, मल्हार कम्युनिकेशन्सचे सीईओ आनंद मल्हारा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सुभाषचंद्र भंडारी यांच्या बदल जाओ तो अच्छा -3 या पुस्तकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच बाफना परिवाराच्या तिसर्‍या पिढीतील सदस्य व रतनलालजी बाफना यांचे नातू रिषभ सुनील बाफना यांची मुंबईच्या एच.आर. कॉलेजमध्ये पाच हजार मुलांमधुन ‘स्टार स्टुडंट ऑफ एच.आर.’ म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमात मल्हार हेल्प फेअरमधील सहभागी जिल्ह्याभरातील 70 संस्था व मल्हार हेल्प फेअरला मदत केलेले सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित संस्थांना मानपत्र व मदतराशीचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने न करता दीपयोगाने करण्यात आली. त्यामध्ये डॉ. अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी दीपयोगा सादर करुन उपस्थितांची मने जिंकलीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्हार कम्युनिकेशन्सचे सीईओ आनंद मल्हारा यांनी केले. त्यामध्ये त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट करीत असतांना सांगितले की, रतनलालजी बाफना यांनी घोषीत केलेल्या मदतराशीचे वितरण या कार्यक्रमाचे नियोजन करीत असतांना दुसरे दोन औचित्य जुळून येवून आजच्या कार्यक्रमात त्रिवेणी संगम झालेला आहे. प्रदर्शनी उद्घाटनाच्या वेळीच बाफनाजींनी सहभागी सर्व संस्थांसाठी मदतराशीचे घोषणा करुन आपल्या दानशुरतेचा व संवेदनशील मनाचा परिचय पुन्हा एकदा सर्वांना करुन दिला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे आभार मानलेत. आपल्या अध्यक्षीय मनोगतात राधेशाम चांडक यांनी पुढे सांगितले की, “शेंदूराची चार बोटं लागल्याबरोबर दगडाचा देव होतो आणि हा देव आहे असा विश्‍वास लोकांच्या मनातही निर्माण होतो. समाजसेवी संस्थांचही तसंच आहे. त्यांच्याप्रती विश्‍वास निर्माण झाल्यावर लोक मदत करतात. मल्हार हेल्प फेअर ही अभिनव संकल्पना असून अशीच प्रदर्शनी आम्ही आमच्या बुलढाण्याला देखील घेवू” अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. प्रमुख वक्ते म्हणून यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले, की “सामाजिक काम करीत असतांनाही बर्‍याच वेळ स्वार्थ मनामध्ये येतो. म्हणून स्पर्धा नको सहकार्य हवं. आपण सामाजिक काम करणारे लोक व्यावसायिक नाही आहोत. म्हणून सर्वजण एकत्र येवून एकमेकांना मदतरुप होवू शकतो का? यावर सर्वांनी विचार करायला हवा आणि त्यादृष्टीने प्रयत्नही करायला हवेत.” यावेळी सुभाषचंद्र भंडारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, रतनलालजी बाफना, भालचंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्ती केले. तसेच मल्हार हेल्प फेअरमध्ये सहभागी सर्व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून अद्वैत दंडवते, श्रीमती रेवती ठिपसे व सुनील देवरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. श्रीमती रेवती ठिपसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, की “आम्ही गेल्या 10 वर्षांपासून कॅन्सर रुग्णांसाठी काम करीत आहोत. मात्र या प्रदर्शनीमध्ये तुमचं नाव घेतलं आहे असं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं त्यावेळी आम्हाला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे एक पैसाही न घेता आयोजकांनी सर्व संस्थांना यामध्ये सहभागी केलेलं होतं. मी आनंद मल्हारा यांनी विचारले, की आमच्या फंडमधून आम्ही पैसे देवू शकतो. मात्र त्यांनी एक रुपयाही नको असे आम्हाला सांगितले. त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे तीन दिवसात आमचे कार्य कित्येक लोकांपर्यंत पोहचले. म्हणून हेल्फ फेअरच्या सर्व टीमला तसेच मदत राशी दिल्याबद्दल रतनलालजी बाफना यांचेही मन:पूर्वक आभार!” कार्यक्रमाला गनी मेमन, डॉ. रितेश पाटील, चंद्रशेखर नेवे, अभयराज चोरडिया, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, राजेंद्र बलाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्हार हेल्प फेअर टीम व बाफना परिवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अपुर्वा वाणी व आभार प्रदर्शन मनीष पात्रीकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.