नंदुरबार :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. दरम्यान मोदी यांनी कॉंग्रेसवर आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले या निवडणुकीनंतर देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. कॉंग्रेस आदिवासींच्या आरक्षणाला आणि जमिनीला धक्का लावत असल्याचा आरोप करीत आहे. परंतु मी सत्तेवर आहे तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. महाराष्ट्र व नंदुरबार शहीदांची भूमी आहे. परंतू शहीदांवरही काँग्रेस राजकारण करते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
मोदी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही घोटाळेबाज पक्ष आहेत. नंदुरबारमधूनच त्यांनी आधार कार्ड योजनेची सुरूवात केली होती. मात्र, आता ही योजना जेव्हा मी राबवू पहातोय तेव्हा काँग्रेसचे लोक आधार कार्ड योजना बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. आदिवासी बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करणार अशीही घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मी सत्तेवर आहे तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे मोदी यावेळी म्हणाले. नवभारत योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना पक्की घरं देणं, त्यांच्या घरी गॅस पोहचणं, त्यांचा सन्मान करणं ही आमची त्रिसूत्री आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि इतर पक्ष तुमची थट्टा करीत आहेत. मध्यप्रदेशात आदिवासी विकास योजनांसाठी पाठवलेला निधीही या पक्षांनी खाल्ला. कुपोषणाची समस्या आपल्याला समूळ नष्ट करायची आहे. मात्र, काँग्रेसवाल्यांची नियत साफ नाही म्हणूनच त्यांचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशातही ते या पैशांमध्येही भ्रष्टाचार करीत आहेत, असेही मोदी म्हणाले.