नवी दिल्ली:- श्रीनगरमधून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आलं आहे. अब्दुल मजीद बाबा असं या अतिरेक्याचं नाव असून त्याच्यावर २ लाखाचं बक्षीस होतं.
एका गुन्ह्यासाठी तो दिल्ली पोलिसांना हवा होता. एका गुन्ह्यासाठी तो दिल्ली पोलिसांना हवा होता. २००७मध्ये दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि अतिरेक्यांदरम्यान चकमक उडाली होती. त्याच प्रकरणी तो फरार होता. या चकमकीनंतर पोलिसांनी तीन अतिरेक्यांना अटकही केली होती. मात्र या सर्व अतिरेक्यांची कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. परंतु, २०१५मध्ये उच्च न्यायालयाने या अतिरेक्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर दिल्ली उच्च न्यायालयाने अब्दुल विरोधात वॉरंट जारी केलं होतं.
अब्दुल मजीद बाबा हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा गावचा रहिवासी आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाला गुंगारा देऊन फरार झालेल्या अब्दुलवर २ लाखांचं बक्षीस होतं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्याविषयीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि शनिवारी श्रीनगरमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या.