जागतिक धुम्रपान, मद्यपान दिनानिमित्त नितीन विसपुतेंचे मार्गदर्शन
जळगाव | प्रतिनिधी
जागतिक आरोग्य संघटनेने घोषीत केलेल्या 31 मे जागतिक धूम्रपान आणि मद्यपान निषेध दिनानिमित्त आपल्या जीवनशैलीमध्ये व्यसनांना स्थान न देण्याची प्रतिज्ञा जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांनी घेतली. यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन करत व्यसनामुळे शारीरिक व्याधींना बळ मिळते. हे टाळण्यासाठी, निरोगी मन व शरीर ठेवण्यासाठी धुम्रपान आणि मद्यपान या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असा सल्ला दिला.
जैन इरिगेशनच्या बांभोरी येथील प्लास्टिक पार्कमधील डेमो हॉल येथे तर फुडपार्क, ॲग्रीपार्क, एनर्जी पार्कच्या सहकाऱ्यांसाठी ओनियन ट्रेनिंग हॉल येथे तंबाखूचे शरीरावर होणारे दूरगामी दुष्परिणाम, आजार आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग याविषयावर नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, भिकेश जोशी, विक्रांत माळी, वैभव चौधरी, अजय काबरा, जैन इरिगेशनचे कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे व सहकारी उपस्थित होते. उपस्थितीत सहकाऱ्यांनी ‘मी कोणतेही व्यसन करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही’ ही प्रतिज्ञा घेतली.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी संस्कारीत केलेल्या आदर्श कार्यसंस्कृतीतून सहकाऱ्यांना व्यसनांपासून दूर ठेवले. मोठ्याभाऊंच्या संस्कारातून वेळोवेळी निरोगी आयुष्याचे महत्त्व पटावे यासाठी विशेष कार्यशाळा, तज्ज्ञांचे व्याख्यान कंपनीतर्फे आयोजित केले जाते. यातून वैयक्तिक पातळीवर प्रबोधन करून तंबाखू आणि तत्सम नशाकारक पदार्थांपासून होणाऱ्या आरोग्यहानीची जाणीव करून दिली जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी केले. आभार दिनेश दीक्षित यांनी मानले.