पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने मुंबई गोवा महामार्गावरील कंपनीच्या गोवा गेट समोरील रस्त्यावर सुशोभीकरण सुरू केल्याने येथे व्यवसाय करणाऱ्या विक्रम मिनीडोर चालक आणि मालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
सुशोभीकरणाच्या नावाखाली पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने मुंबई-गोवा महामार्गावरील कंपनीच्या गोवा गेट समोरील रस्त्यावर कंपनीतर्फे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 50 ते 60 फूट बांधकाम करून बगीचा तयार करण्याचे काम सुरू आहे. सदरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विक्रम मिनीडोअर व्यवसाय करीत आहेत. या बगीच्या मुळे दोन्ही बाजूला उभे राहणारे विक्रम चालकांना सध्या आपली वाहने रस्त्यावर उभी करायला लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सदरचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व शेकडो विक्रम चालकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील विक्रम चालक संघटनेचे अध्यक्ष संजय जांभळे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणाची आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी शेकडो विक्रम चालक मालकांनी आपल्या व्यथा मांडल्या. कंपनी प्रशासनाकडून शासकीय भूखंडा हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय जांभळे यांनी केला. या शेकडो विक्रम चालक मालकांना न्याय देण्याकरिता सोमवारी कंपनी प्रशासना बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच या यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे विचारणा केली जाईल अशी माहिती आमदार दळवी यांनी दिली. तसेच कंपनी प्रशासनाने विक्रम चालकांवर अन्याय सुरु ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी दिला.