मुंबई : राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला, तर काही ठिकाणी पाऊस झालाच नाही. दरम्यान, जून महिन्यात पाऊस झाला नाही तरी जुलै महिन्यात पाऊस चांगला होईल, असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जून संपत आला तरी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात तरी पाऊस पडेल का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी काही भागात पाऊस झाला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पाऊस व्हायचा आहे.
दरम्यान, कोकणातील रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात आज पहाटेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पावसाअभावी करपू लागलेल्या भातरोपांनाही जीवदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अलिबागसह पेण, नागोठणे, कोलाड, पाली परिसरात पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. तासभर बरसल्यानंतर पावसानं उघडीप घेतली आहे.