यावल (जळगाव) – आज दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक मनुष्याची धडपड ही आनंद मिळावा म्हणून असते, हा आनंद केवळ साधना करूनच मिळू शकतो. साधना केल्याने जीवनात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते, म्हणून प्रत्येक मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले. यावल येथील श्री विठ्ठल मंदिर येथे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते.
या प्रवचनात त्यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, स्वभावातील दोष दूर करून ईश्वराची प्राप्ती कशी करायची अशा अनेक विषयांवर उपस्थित जिज्ञासूंना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. याचा लाभ यावळमधील ९० महिला आणि पुरुष जिज्ञासूंनी घेतला.