Sunday, May 29, 2022

जिल्ह्यासाठी कोरोनाची धोक्याची घंटा

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. गेल्या आठ दिवसातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढती आकडेवारी आरोग्य विभाग व प्रशासनाला सतर्क करणारी आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग नसला तरी कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन उभी ठाकली आहे. कालच्या आणि आजच्या कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यात बुधवार दिनांक 12 जानेवारी रोजीची कोरोना रूग्णांची आकडेवारी एकूण 285 इतकी झाली आहे. त्यात भुसावळला सर्वाधिक म्हणजे 104 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव शहरात 81 रूग्ण आढळले आहेत. चाळीसगाव – 29, चोपडा – 22, जळगाव ग्रामीण – 17, अमळनेर – 5, पाचोरा – 3, भडगाव – 0, धरणगाव – 2, यावल – 1, पारोळा – 5, मुक्ताईनगर – 12, बोदवड – 0, इतर जिल्ह्यातील – 1 असे एकूण जिल्ह्यात 285 कोरोनाचे रूग्ण असून भडगाव, एरंडोलला आणि बोदवड हे तालुके वगळले तर बाकी 12 तालुक्यात तिसऱ्या लाटेच्या संसर्ग झाला आहे.

- Advertisement -

बुधवारी शहरात कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला ही बाब गंभीर म्हणावी लागेल. त्यामुळे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधीत मृत रूग्णांचा आकडा 2 हजार 580 इतका झाला आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा 1 लाख 43 हजार 892 इतका झाला असून त्यापैकी 1 लाख 40 हजार 280 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्ण कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या 19 इतकी आहे. तर 1032 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रूग्णांपैकी बहुतेक सर्व गंभीर स्वरूपाचे नाहीत. ही एक जमेची बाजू म्हणता येईल.

- Advertisement -

तिसऱ्या लाटेतील बहुतेक सर्व रूग्णांना घसा, सर्दी आणि खोकला हीच लक्षणे प्रामुख्याने दिसत आहेत. अद्यापपर्यंत एकालाही आयसीयुमध्ये अथवा ऑक्सीजनवर ठेवले गेलेले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील रूग्णांमध्ये फुफ्फुसाचे तसेच शरीरात ऑक्सीजन कमी होणे ही प्रमुख लक्षणे होती. त्यामुळे कोरोना रूग्णाला थकवा जाणवणे आणि अंगात ताप येणे ही लक्षणे होती. त्यामुळे पहिल्या – दुसऱ्या लाटेतील रूग्णांना कोरोनाचा जो गंभीर त्रास जाणवत होता तो या तिसऱ्या लाटेत जाणवत नसला तरी प्रत्येकाने आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे.

तिसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांना सौम्य त्रास होतोय असे दिसत असले तरी लसीकरणामुळे हा त्रास कमी जाणवत आहे. एवढे मात्र निश्‍चित. कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसीचे डोस घेणाऱ्यांना सुध्दा तिसऱ्या लाटेचा काही जणांना प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे मी दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणून कोरोना प्रतिबंधित नियमांना तिलांजली देऊन स्वैरपणे वावरता येणार नाही याची प्रत्येकाने नोंद घेणे गरजेचे आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे बुस्टर डोस घेतले तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर 18 वर्षे व त्यापुढील वयोगटातील तरुणांनी कोरोना प्रतिबंधाची लस तातडीने घ्यावी.

शासनाने तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी लस देण्याचे केंद्र जाहीर केलेले आहेत. तेथे जाऊन लस घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अथवा संक्रमण थोपविण्यासाठी शासनाने जे प्रतिबंध घातलेले आहेत. त्या प्रतिबंधाचे पालन करणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जात आहे. आपण दंड भरू परंतु मास्क लावणार नाही अशा प्रवृत्तीला वेळीच रोखण्याची गरज आहे.

पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणेच सतत हात धुणे, सॅनीटायझर करणे हे बंधन कटाक्षाने पाळले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी शक्यतोवर जाणे टाळणे आवश्‍यक आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्‍यक आहे. शक्यतोवर बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे तसेच प्रत्येक वस्तू स्वच्छ करून अथवा सॅनिटायझर करून घरात आणावी. भाजीपाला घेतल्यानंतर तो घरात आणल्यावर तातडीने मिठाच्या पाण्याने धुवून काढावे आणि त्यानंतरच भाजीसाठी तिचा उपयोग करावा. शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधाचा तंतोतंत पालन करावे. अन्यथा लॉकडाऊन तुमचे दार ठोठावतेय एवढे लक्षात ठेवा. ही धोक्याची घंटा ओळखा.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या