जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबरमध्येही कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. रोज रुग्णसंख्या घटत असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्ण कमी होत आहेत. साधारण सात महिन्यांनंतर सर्वात निच्चांकी बाधित रूग्णांची नोंद आज झाली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात केवळ २१ नवीन रुग्ण आढळून आले तर ३२ रूग्ण बरे झाले आहेत. यात जळगाव शहरात फक्त एक रूग्ण बाधीत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी गत २४ तासांमधील नवीन कोरोना बाधीतांची माहिती दिली आहे. यात आज २१ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आजच ३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजचा विचार केला असता, यात यावल ११ आणि भुसावळातील पाच रूग्णांचा समावेश आहे. यासोबत मुक्ताईनगर २, रावेर, पारोळा व जळगाव शहर येथून प्रत्येकी एक कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात जळगाव शहरात एका रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, गत २४ तासांमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवरच्या मृतांचा आकडा १२७७ वर पोहचला आहे. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९७ वर आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या ५३ हजार ७७८ इतकी झाली आहे. त्यात ५२ हजार १०४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.