जिल्ह्यात प्रथम आल्यानंतर पाचोरा पंचायत समितीची विभागीय पुरस्कारासाठी नामांकन ; नगरच्या समितीकडुन तपासणी
पाचोरा | प्रतिनिधी
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पाचोरा पंचायत समितीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्या नंतर विभागीय पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाल्याने विभागीय पुरस्कारासाठी अहमदनगर येथील समितीकडुन पडताळणी करण्यात आली असून विभागातही प्रथम क्रमांक मिळणार असल्याची खात्री गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप हे जिल्हा परिषद ठरविणार असुन विभागीय स्तरासाठी प्रथम ११ लाख रुपये, द्वितीय ८ लाख रुपये व तृतीय ३ लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार योजना सन – २०१८/१९ साठी पाचोरा पंचायत समितीचे विभागीय स्तरावर नामांकन जाहीर झाले आहे. ज्या पंचायत समितीने विविध स्तरांवरील कामांमध्ये ३०० पैकी २२५ च्या वर गुण मिळविले असतील अशा पंचायत समितीला “ए” प्लसमध्ये समावेश करण्यात येतो. यात पाचोरा पंचायत समितीने पुरस्कारासाठी असलेले सर्व निकष पूर्ण केले असुन विभागीय स्तरावर वरील पुरस्कारासाठी अहमदनगर येथील सहाय्यक गट विकास अधिकारी संजय दिघे व विस्तार अधिकारी डी. जी. ठाकरे यांनी पाचोरा पंचायत समितीत प्रशासकीय कामांची पाहणी करून यात सन २०१७/१८ मध्ये पं. स. च्या वर्षभरात झालेल्या सर्व साधारण सभांना सदस्यांची असलेली उपस्थिती, सभेतील प्रश्नावली, रचनात्मक कार्य पध्दतीत नोंद वह्या, सेवा पुस्तके, आराखड्याचे कामकाज, तक्रार निवारणात आलेल्या तक्रारी व तक्रारींचे निवारण, तपासण्यांमध्ये आयुक्त, जि. प. चे मुख्याधिकारी यांनी केलेल्या तपासण्या महिला व बालकल्याण विभागात पोषण आहार, अंगणवाडीतील कुपोषित बालकांविषयींची समस्या व उपाययोजना, मुलभुत साहित्य, स्री, पुरष लिंगोत्तर, आरोग्य विभागात कुटुंब नियोजन, प्रसुतीपुर्व नोंदणी, विविध लसीकरणे, माता मृत्यू प्रमाण, जननी सुरक्षा योजना, कृषी विभागातील बायो – गॅस कृषीच्या विविध योजनांचा लाभ, आदिवासी योजनांचा लाभ, पाणी पुरवठा योजनेतील योजनांचा लाभ, पाणी टंचाई आराखडा, पाणी टंचाई निवारन, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा (डी.आर.डी.ए.), पंतप्रधान घरकुल योजना, शबरी व रमाई घरकुल योजनेचा दिलेला लाभ, बंद पडलेल्या बचतगटांचे पुरणोजिव्व करणे, नव्याने बचत गट स्थापन करणे व त्यासाठी भांडवल पुरवठा करणे, स्वच्छता अभियान योजनेत हगणदारी मुक्त अभियान, शौचालय, घनकचरा निवारण, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा विविध प्रकारचे निकष पूर्ण केल्याने पाचोरा पंचायत समितीचे विभागीय पुरस्कारासाठी नामांकनात समावेश करण्यात आला आहे. यासाठी आमदार किशोर पाटील, पं. स. सभापती बन्सीलाल पाटील, उपसभापती अनिता पवार, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, पं.स.चे कृषी राजु ढेपले, सहाय्यक गट विकास अधिकारी विलास सनेर, विविध विभागाचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यानेच पुरस्कारासाठी विभागा पर्यंत जावुन पोहचल्या गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी सांगितले.