जळगाव :– जिल्ह्यात शेंदुर्णी, चोपडा आदी भागात दुसर्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विविध भागात आंब्याच्या झाडावरील मोहोर गळून पडला. तर शहरात ढगांच्या गडगडाटासह विजा चमकून पावसाने रात्री 9.45 वाजेच्या सुमारास हजेरी लावली. यावेळी व्यवसायीकांची एकच त्रेधा उडाली.
शहरात सकाळपासूनच अभ्राच्छादित वातावरण होते. दिवसभरात रोज जाणवणारा उन्हाचा चटका जाणवला नाही. काल रविवारपासून संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्यातून चोपडा आदी ठिकाणी पावसाचे वृत्त होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारपासूनच शहरात उकाडा जाणवत होता. सोमवारी अभ्राच्छादित वातावरण असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होणार्या रस्त्यांवर गर्दी तसेच बाजार गर्दीने फुललेले दिसून येत होते. संध्याकाळच्या सुमारास हवेतही गारवा निर्माण झाला होता. रात्री 9.45 वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजा चमकून ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.