गेल्या दिड वर्षापासून कोरोना महामारीच्या पहिल्या- दुसऱ्या लाटेशी जिल्ह्यातील जनता सामना करते आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे जनता त्रस्थ झाली असतांना पुन्हा तिसऱ्या लाटेचे भूत डोक्यावर आहेच. गर्दी टाळा अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल असे प्रशासन बजावत आहे. आता कुठे जिल्ह्यातील आर्थिक गाडी थोडी बहुत रूळावर आली असतांना निसर्गाचा तडाखा बसतो आहे. चार दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले त्यात दोन जणांचा बळी गेला. शेकडो गुरे वाहून गेली. 7-8 गावे उद्ध्वस्त झाली. चाळीसगाव शहरातील घरांमध्ये आणि दुकानात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. कन्नड औट्रम घाटात सात ठिकाणी दरडी कोसळल्या. अद्याप तो मार्ग बंदच आहे. युध्द पातळीवरून रस्त्यावरील मलबा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादला जाण्यासाठी कन्नड – गोताळा मार्गे घाटातून वहानधारक जात होते. परंतु कन्नड गोताळा घाटातही काल दरड कोसळली आणि तोही मार्ग बंद पडला. पुरामध्ये वाहून गेलेल्यांना मदतीचे कार्य सुरू असतांनाच काल पुन्हा मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपले.
जिल्ह्यातील गिरणा, तापी, वाघूर, कांग, अंजनी, तितूर, बोरी आदी जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वहात आहेत. बोरी नदी पात्रातून जाता आले नाही म्हणून एका महिलेचा मृत्यू झाला. मन्याड धरण ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडल्यामुळे तापी नदीला महापूर आलाय. वाघूर नदीला पूर आलाय. एकंदरीत जिल्ह्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वहात आहेत. जळगाव शहरात पाणीच पाणी साचले होते. जामनेर शहर व तालुक्यात ढगफुटीसदृश्य चक्रीवादळी पाऊस झाल्याने तालुक्यात सर्वत्र हाहाकार माजला. खरीप पिकाचे तसेच केळीचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. घरावरील पत्रे उडून गेली. पारोळा तालुक्यात सुध्दा अनेक गावात घरांची पडझड झालीय. एकंदरीत गेल्या चार दिवसांपासून धुव्वाधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेय. गेले महिनाभर पावसाने ओढ धरली आणि आता धुव्वाधार पावसाचा सामना करावा लागत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरू असतांना आता जिल्ह्यातील जामनेर तालुक्याला शेती पिकांचे तसेच घराचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे रस्त्यांची सुध्दा वाट लागलीय. गेले चार दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शेती पिकाच्या नुकसानीबरोबरच ढगाळ पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोंगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्दी -पडसे – खोकला आदींची साथ निर्माण झाली असून दवाखाने हाऊसफुल्ल आहेत. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा असणाऱ्यांना त्रासदायक झाली आहे. अस्थमा रोगाचे रूग्ण त्रस्त झाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरते ना ओसरते तोच अतिवृष्टी व संततधारेमुळे साथीच्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुन्हा तिसऱ्या लाटेचे भूत डोक्यावर आहेच. हिंदूच्या सणांचे दिवस असतांना शासकीय निर्बंधामुळे गणेशोत्सव, दुर्गेात्सव आदी जल्लोषात साजरे करण्यात येणाऱ्या सणांवर बंधने आली आहेत. बंधनात साजरे करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. शाळा – महाविद्यालये बंद असल्याने प्राथमिक शाळेत जाणाऱ्या लहान लहान बालकांवर विपरित परिणाम होतो आहे. हायस्कूल व महाविद्यालये बंद असल्याने तरूणांवर विपरित परिणाम होतो आहे. परंतु बंधने घातली गेली नाहीत तर कोरोनाला आवरणे मुश्किल होईल. लोकांचे जीव महत्वाचे आहेत.
महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारतर्फे कोरोना निर्मुलनाला प्रथम प्राधान्य दिले जातेय ही चांगली बाब म्हणता येईल. परंतु या बंधनामुळे दुसऱ्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सोयीची असते. परंतु पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे त्यांची फार मोठी पंचाईत झाली आहे. मुंबईची लोकल रेल्वे जशी मुंबईकरांची जीवनदायीनी आहे असे संबोधले जाते तसे पॅसेंजर रेल्वे ेगाड्या या गरीबांची जीवनदायीनी आहेत. म्हणून मुंबईमध्ये ज्या धर्तीवर लोकल रेल्वे सुरू केली. त्या धर्तीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर नोकरीच्या निमित्ताने दररोज अपडाऊन करणारे हजारो चाकरमान्यांची फार मोठी कुचंबणा होतेय. त्यांचे फार मोठे नुकसान होतेय. त्याकरिता मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आली.त्या धर्तीवर पॅसेंजरमधून प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी तसा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करावा एवढेच या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे.