जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध हटवा…

0

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. परंतु महाराष्ट्रासह देशात दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट जवळजवळ ओसरत आहे. मंगळवार दिनांक 13 जुलैच्या जिल्ह्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नजर टाकली तर भुसावळला 1, अमळनेर 2, जामनेर 1, चाळीसगावला 2 असे एकूण 6 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्या तुलनेत 26 कोरोनाचे रूग्ण बरे होऊन घरी गेलेत म्हणजे कोरोनाबाधीत रूग्णांपेक्षा जवळजवळ चार पटीपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. आज एकही कोरोनाबाधीत रूग्णाचा मृत्यू झालेला नाही हे विशेष. आतापर्यंत 1 लाख 39 हजार 664 इतके कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. आता संपूर्ण जिल्ह्यात 237 इतकेच ॲक्टीव्ह रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झालेला आहे. परंतु संपूर्ण कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून एकूण 2 हजार 574 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा चिंताजनकच म्हणावा लागेल.

परंतु आता जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती बदलली आहे. दुसरी लाट ओसरत चालली असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन निर्बंध आता हटवावेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यावर लागू केलेले निर्बंध तातडीने हटवावे अशी व्यापाऱ्यांपासून ते सामान्य लहान व्यावसायिकांकडून जोरदार मागणी  होत आहे. विशेषत: ज्यांचे हातावर पोट आहे. दरररोज कमाई केल्याशिवाय संसारात चूल पेटत नाही असे न्हावी, कुंभार, फूलवाले, रिक्षावाले, पानटपरीवाले, छोटे छोटे दुकानदार आदींची मागणी आहे. हातगाडीवर व्यवसाय करणारे त्रस्त आहेत.कारण त्यांचा धंदा सायंकाळला सुरू होऊन रात्री 10 पर्यंत चालतो. हा त्यांचा व्यसायाचा पिक पिरियड असतो. नेमके त्याचवेळी संचारबंदी असल्याने बिचारे हातगाडीवाले हैराण आहेत. त्याकरिता आता महाराष्ट्रातील जळगावसारख्या गरीब सर्वसामान्य व्यावसायिकांचे अर्थचक्र चालू करावे.

महाराष्ट्रातील काही 7-8 जिल्ह्यात अद्यापही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती गंभीर असल्याचा अहवाल आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोनाची रूग्णसंख्या वाढते आहे. त्या जिल्ह्यापुरते लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवले तरी चालेल. परंतु जळगावसारख्या जिल्ह्यात जेथे कोरोनाची रूग्णसंख्या वाढत नाही तिथे निर्बंध हटवावेत. लॉकडाऊनचे निर्बंध हटविले म्हणजे पूर्णपणे आपण स्वतंत्र झालो असे नव्हे. निर्बंध हटविले तरी येणाऱ्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी आपण सर्वच जण सज्ज असले पाहिजे त्यासाठी प्रशासनाने जी शिस्त अंमलात आणली त्या शिस्तीचे पालन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य राहील.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जी त्रीसूत्री आहे त्याचा अंमल तर सर्वांनी पाळलाच पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नका. घराबाहे पडाल तेव्हा तोंडाला मास्त लावलेच पाहिजे. सतत हात स्वच्छ धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणी गर्दी कशी टाळता येईल. या दृष्टीने विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कोणत्याही दुकानात अनावश्यक गर्दी टाळा, दुकानात मास्क घालून प्रवेश करा. या गोष्टीचे पालन केले तर येणाऱ्या तिसऱ्या लाटेला आपण परतवून लावू शकतो. तिसरी लाट घातक आहे किंवा नाही याचा विचार न करता ती लाट घातक आहे असे गृहित धरूनच आपण वागले पाहिजे. तिसरी लाट मुलांसाठी घातक आहे असे म्हणतात. त्याकरिता लहान मुलांची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर 18 वर्षावरील सर्वांनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ज्या ज्या बाबींची आवश्यकता त्या सर्व बाबींचा आपण अवलंब केले पाहिजे, म्हणजे तिसऱ्या लाटेशी आपण सक्षमपणे मुकाबला करू शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तरच प्रशासनाला लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्याचे समाधान होईल. अन्यथा कोरोनाचा संसर्ग वाढला, रूग्ण संख्या वाढत असेल तर नाईलाजास्तव शासनाला पुन्हा लॉकडाऊनचे हत्यार वापरावे लागेल. तेव्हा शासनाच्या नावाने रडत बसण्यापेक्षा आताच आपण नियमांचे पालन केले तर दोन्ही बाजूने चांगले म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here