जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सींगचे पालन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील काही उत्पन्न बाजार समित्याचे व्यवहार बंद करण्यात आले. मात्र, यामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय पाहून जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांचे व्यवहार लॉकडाउनच्या काळात सुरू ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत.
सोशल डिस्टन्सींग पाळली जात नसल्याने गेल्या आठवड्यात वरील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंदचे आदेश दिले होते. मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो माल शेतकऱ्यांना एकतर कमी भावात विकावा लागतो किंवा घरी परत आणावा लागतो. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी वरील बाजार समित्या पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धान्य बाजारांचे व्यवहार सुरू ठेवताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, आदेश, निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ न देता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) पाळावे. त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील.