जळगाव । १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्हयातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदार संघात सकाळी ७ वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. दिवसभरात किरकोळ अपवाद वगळता सुरळीत व शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा मतदार संघात ५८ टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघात अंदाजे ६१ टक्के मतदान झाले. जळगाव मतदार संघात १४ आणि रावेरमध्ये १२ अशा २६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. यावर आता विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात अनेक केंद्रावर मतदान करण्यासाठी महिला व पुरुषांसह तरुण व तरुणींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यंदा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीचा सर्वत्र चांगलाच परिणाम दिसून आला. रखरखीत उन्हात सुद्धा मतदांना करिता नागरिक घराबाहेर उत्स्फूर्त पणे निघाले. निवडणुकी पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तगडी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. सकाळी सात वाजेपासून मतदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि मतदारांमध्ये वेगळा उत्साह दिसून आला. मात्र शहरी मतदारांमधे मतदानासंदर्भात किंचीतशी उदासीनता दिसून आली तर ग्रामीण भागात मात्र नवयुवकांपासून ते थेट वयोवृद्ध मतदारांमधे कमालिचा उत्साह दिसून आला.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 3617 मतदार केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर पाळणाघराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. तर काही ठिकाणी पालकांसोबत मतदान केंद्रावर आलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी खेळणी व खाऊचीही व्यवस्था करण्यात आली होती. पाळणाघरात अंगणवाडी सेविका लहान मुलांची काळजी घेत होत्या.
निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील 12 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. एरंडोल येथील आदर्श मतदान केंद्रावर मतदारांचे ढोल वाजवून स्वागत करण्यात येत होते.
जळगाव लोकसभा मतदार संघ सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान
जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात -45.48% ,जळगाव ग्रामीण -56.36%, अमळनेर-49.77%,पारोळा-एरंडोल-55.76%, चाळीसगाव-53.89%, पाचोरा-भडगाव-53.94%.
रावेर लोकसभा मतदार संघ सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
चोपडा – 57.14%, रावेर-यावल- 62.01%,भुसावळ- 48.87%, जामनेर- 55.07%, मुक्ताईनगर- 57.56 %, मलकापूर – 60.99 % याप्रमाणे मतदान झाले आहे.