जिल्ह्याच्या पदरात भोपळा !

0

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री धडाडीचे नेते अजित पवार यांचा शुक्रवार दिनांक 17 रोजी जळगाव जिल्हा दौरा पार पडला. जिल्ह्यातील विविध कामाचा आढावा जिल्हा नियोजन सभागृहात घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह सर्व पक्षाचे आमदार – खासदार, जि.प.चे पदाधिकारी, जळगावचे महापौर, सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाडा वाचला. जळगाव शहर महानगरपालिकेच्या कारभारावर मनपा प्रशासनाला कानपिचक्या दिल्या. अमृत योजनेच्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला. त्यानंतर अमृत योजनेच्या संदर्भात मुंबईला बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

आढावा बैठकीला ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रतिबंधाबाबत उपाय योजनांवर भर दिला. त्यानंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अत्याधुनिक नवीन दूध संकलन केंद्र तसेच विविध दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लाँटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले. त्यानंतर भुसावळ पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्यांचे मुख्य उपस्थितीत पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 21 नगरसेवकांच्या राष्ट्रवादीत प्रवेश हा मुख्य राजकीय कार्यक्रम पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेच्या कमबॅकच्या दृष्टीने हा राजकीय कार्यक्रम त्यांच्यासाठी महत्वाचा होता. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर दोन वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदा जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्यामुळे जळगाव जिल्हा वासीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात अनेक प्रलंबित विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी काही निधीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती.

परंतु प्रलंबित विकास प्रकल्पाबाबत त्यांनी कसलीही घोषणा केली ना. जिल्ह्यातील पाडळरसे धरण, शेळगाव बॅरेज, बोदवड सिंचन प्रकल्प हतनूर धरणाचे नवीन दरवाजे, वाघूर धरणातील पाण्याचे पाईपद्वारे शेतीला पाणी देणे, मेघा रिचार्ज प्रकल्प, गिरणा नदीतील बलून बंधारे हे रखडलेले प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाले तर जिल्ह्यातील शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बदलू शकते. परंतु या संदर्भात प्रत्येक रसकार वेळ काढू धोरण घेत आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात तेच झाले. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळातही तेच होते आहे. फडणवीस सरकारमध्ये तर जळगाव जिल्ह्याचे गिरीश महाजन हे खुद्द जलसंपदा मंत्री होते. परंतु जिल्ह्यासाठी फक्त 7 बलून बंधाऱ्यांच्या घोषणेऐवजी काहीही केले नाही. सर्व सिंचनाचे प्रकल्प जैसे थे पडून आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास खात्याचे एक दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांचा यापूर्वी दिवसभर दौरा झाला. त्यांच्या दौऱ्यातून जळगाव जिल्ह्याच्या पदरात काहीतरी पडेल ही अपेक्षा होती. तथापि त्यांनी सुध्दा दिवसभर बैठकांमध्ये सत्र केले आणि शेवटी मुंबईला पुन्हा आढावा बैठक घेवून त्यात निर्णय घेवू असे आश्वासन देवून निघून गेले. त्यानंतर अद्याप मुंबईला आढावा बैठक झालेलीच नाही. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गुप्तपणे आले आणि गुप्तपणे निघून गेले. हा त्यांचा खाजगी दौरा होता असे सांगण्यात आले.

खा.संजय राऊत आले आणि शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या राजकीय बैठका व कार्यक्रम पंरतु जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात किंवा प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात अद्याप कोणी काही बोलत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. तथापि, त्यांचेकडून सुध्दा जळगाव जिल्हावासियांच्या तोंडाला पाने पुसली. तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विकास प्रकल्प अथवा विकास कामाच्या संदर्भात कोणतेही निर्णय घेतले जात नाही. विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या नावाखाली शासकीय दौरे करून आपल्या  पक्षाच्या संघटनेच्या  दृष्टीने पक्ष मजबुतीसाठी प्रत्येक नेता आपले पाऊले टाकतात.

शिवसेनेचा नेता आला की शिवसैनिकांकडून त्यांचा उदोउदो केला जातो. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणता येईल. अजित पवारांच्या दौऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा हा होता असे म्हटले तर अतिशोकती होणार नाही. जिल्ह्यात आपली ताकद कशी वाढेल  याचे शक्तीप्रदर्शन केले जाते परंतु विकास कामाबाबत मात्र सर्वत्र …… आहे असे म्हणता येईल. त्यासाठी जिल्ह्याला खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी मजबूत असावा ही अपेक्षा आहे. तथापि जिल्ह्यातील भाजप दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. कालचे जळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी – विरोधी नगरसेवकांचा तोडपाणीवरुन झालेला दांगडो हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.