Sunday, May 29, 2022

जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी; प्रक्रियेस होणार प्रारंभ

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आल्याने जेडीसीसीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकारातील मोठे बलस्थान असणार्‍या या संस्थेवर कब्जा मिळवण्यासाठीच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी मुदत संपूनही राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही. या निवडणुकांना दुसर्‍यांदा मार्च अखेरीस मुदतवाढ दिली होती. यानुसार ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापि, सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्याच्या सहकार खात्याने जिल्हा बँकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत मुदत संपलेल्या १३ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या १३ बॅकांमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश असल्याने या बँकेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मे २०१५ मध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जेडीसीसीची निवडणूक झाली होती. तेव्हाचे महसूलमंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री असलेले एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत मिळाले होते. यानंतर नाथाभाऊंची कन्या रोहिणी खडसे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. तेव्हापासून सुमारे सहा वर्षापर्यंत त्याच बँकेची धुरा सांभाळत आहेत. आता बदललेल्या राजकीय स्थितीमध्ये खडसे यांच्याकडे जिल्हा नेतृत्व नसल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता तशी धुसर आहे. याचा विचार करता आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकण्यात आल्याने पडद्याआडच्या हालचाली गतीमान झाल्याचे दिसून येत आहे. मोठे आर्थिक बलस्थान आणि सत्तेचे केंद्र असणार्‍या जेडीसीसवर कब्जा मिळवण्याची रणनिती आखण्यास प्रारंभ झाला असून यात नवीन समीकरण उदयास येणार का ? याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबतच जळगाव जिल्हा दूध संघ, ग. स. सोसायटी, मराठा विद्याप्रसारक मंडळ आणि जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणुकाही लवकरच होणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत घडामोडीस प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या