जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे ही जिल्ह्यातील नागरिकांची नैतिक व व सामाजिक जबाबदारी
सातारा : प्रतिनिधी
आपल्या देशातील व राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी दिनांक २३ व २४ मार्च, २०२० संपूर्ण देशात व राज्यात कडक लॉक डाऊनची घोषणा करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन-तीन महिन्यापासून पूर्ण देशात व राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. लॉक डाऊन व अनलॉक या दोन्ही प्रक्रिया कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांच्यासाठी वेळोवेळी विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या होत्या व आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन जिल्ह्यातील सुज्ञ नागरिक करताना दिसून येत आहेत. परंतु आजही स्वयंशिस्त व सामाजिक शिस्त न पाळणाऱ्या बेशिस्त व्यक्तींच्या समाजातील व व्यवहारातील वर्तणुकीमुळे कोरोना विषाणू संसर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दिसून येत आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याशिवाय जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडणे अशक्य असून जिल्हा प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे ही जिल्ह्यातील नागरिकांची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, बाजारपेठा आणि भाजीमंडईमध्ये ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी समाजातील अनेक बुजुर्ग व्यक्तींनी, सामाजिक दायित्व मानणाऱ्या समाजसेवकांनी व सामाजिक संस्थांनी ‘दैनिक लोकशाही ‘ शी बोलताना केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आपल्या देशात व राज्यात विशेषत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इत्यादी जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची झपाट्याने बाधा होत असताना सुरवातीच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये केवळ चार-दोन लोक कोरोना बाधित सापडले होते. याच कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते आणि सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सातारा जिल्हा माहिती कार्यालय तसेच सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यामार्फत कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत होते. मात्र ज्या नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी आपल्या घराच्या बाहेर पडावे लागली तर अशा नागरिकांनी आपल्या घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क वापरणे बंधनकारक केले होते. त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालय मध्ये, किराणामालाचे दुकानमध्ये, बाजारपेठेमध्ये किंवा भाजीमंडईमध्ये गेल्यास सामाजिक अंतर ठेवण्याचे वारंवर आवाहन करण्यात येत होते. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या या आवाहनाला जिल्ह्यातील बहुतांशी सुज्ञ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. परंतु सामाजिक शिस्ती बरोबरच स्वयंशिस्त न पाळणाऱ्या काही बेसिस्त लोकांच्या मुळे व अपप्रवृत्ती मुळे सुरुवातीच्या काळात थोड्याफार प्रमाणात असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आपले पाय हळूहळू पसरण्यास सुरुवात केली आणि कोरोना विषाणू संसर्ग बाधितांची संख्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये झपाट्याने वाढत गेल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्ह्यातील सर्व सुज्ञ बंधू-भगिनीची असून कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन जिल्ह्यातील नागरिकांनी करणे ही त्यांची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. जिल्ह्याचा भौगोलिक पसारा पाहता जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत जिल्हा प्रशासन आणि त्यांचे सर्व विभाग पोचू शकत नाहीत. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन वेळोवेळी विविध मार्गदर्शक सूचना व नियमावली जाहीर करीत असतात. या मार्गदर्शक सूचना व नियमावलीप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवले आणि कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवून तसेच बाहेरून घरात आल्यानंतर आपलले हात साबणाने स्वच्छ धुणे आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे या बाबी अवलंबिल्यास कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यास निश्चितच मदत होणार आहे.
अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ज्या नागरिकांना आपापल्या घराच्या बाहेर पडावे लागेल, त्या नागरिकांनी स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाची आणि समाजातील इतर व्यक्तींची काळजी घेणे याचे सामाजिक भान ठेवणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या कामासाठी गेल्यावर तसेच दैनंदिन जीवनात बाजारपेठेतील किराणा मालाची दुकाने, औषधे दुकाने, इतर खरेदी करण्यासाठी असलेली दुकाने तसेच बाजारपेठेतील आणि भाजीमंडईमध्ये गेल्यानंतर सर्व नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय त्यांना कार्यालयामध्ये व बाजारपेठेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम जिल्हा प्रशासनातर्फे लवकरात लवकर राबविण्याची मागणी समाजातील बुजुर्ग, सामाजिक उत्तरदायित्व मानणा-या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी केली असून यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यास निश्चितच मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.