जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व चिखली येथील ग्रामसेवक पी.व्ही.तळेले यांच्यात भ्रमणध्वनीवरच शाब्दिक चकमक उडाली. जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी आपणास शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामसेवकाने केला आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी माफी मागत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे.
दरम्यान, अति उच्च रक्तदाबाने ग्रामसेवक तळेले यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर जिल्हा ग्रामसेवक संघटनेने प्रधानमंत्री किसान योजनेचे संपूर्ण काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसेवकांनी राज्यभर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जि.प. सीईओ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ग्रामसेवक तळेले हे संघटनेच्या नावाखाली काम करण्याचे टाळत असून प्रांताधिकाऱ्यांशीही अरेरावीने बोलत असल्याने मी स्वत: त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांना शिविगाळ केलेली नाही. तळेले यांनी कामाला सुरूवातच केलेली नाही. एकही एन्ट्री केलेली नाही. जनतेच्या, शेतकºयांच्या हिताचे सरकारी काम करण्यास टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही.