जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून तुफान गर्दी ; अमळनेरात बाजार फुल्ल!

0

अमळनेर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलून आठवडी बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र अमळनेरात हे आदेश धुडकावून तुफान गर्दीचा हप्ता सुरू आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे ही बाब कोरोनाच्या वाढीस निश्चित कारणीभूत ठरू शकते.

 

कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर स्थानिक प्रशासनाने काही व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शनिवारी अमळनेर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ठराविक व्यापारी बोलावण्यात आल्याचा आरोप इतर व्यापाऱ्यांनी केला. प्रशासनाने ५० व्यक्तींच्या  मर्यादेचा नियम दाखवत सारवासारव केली. परंतु त्याचे दुष्परिणाम असे झाले की, सोमवारच्या आठवडी बाजाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

 

सकाळी संभ्रमामुळे गर्दी कमी होती; पण सायंकाळी बाजार सुरू झाल्याचे समजताच गर्दी वाढली. एरव्ही रोज पालिका आणि पोलिसांतर्फे कारवाई होत असताना सोमवारी मात्र कारवाई शून्य होती. त्यामुळे गर्दी नियंत्रित नव्हती. अनेकजण बिनामास्क बाजारात फिरत होते. प्रशासनाने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून निर्णय व अंमलबाजवणीत एकवाक्यता आणावी, अशी मागणी होत आहे.

 

स्थानिक प्रशासनाने जागृतीच केली नाही

शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस सलग बंदमुळे मोठे नुकसान होईल, म्हणून आणि आठवडा बाजार बंदबाबत स्थानिक प्रशासनाने जनजागृती केली नाही. त्यामुळे शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांनी तसेच शेती साहित्य, घरगुती साहित्य विक्रेते आपला माल घेऊन बाजारात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.