मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जितेंद्र आव्हाड’ यांना दुर्दैवीरित्या कोरोनाची लागण झाली होती. मागच्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते आज घरी परतले आहेत. दरम्यान, आव्हाड यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया..” असं आव्हाड म्हणाले.
माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
आजारपणाच्या काळात आधार दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे अशा सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या, अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच एक हिंदी कविताही त्यांनी ट्विट केली आहे.