प्रतिनिधी | चोपडा
दि २० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील मोहिदा येथील रहिवासी असलेले आनंदा भगवान बिऱ्हाडे (६५) यांना त्यांचे जावाई चेतन राजेंद्र सोनवणे(२८) रा अयोध्यानगर,जळगाव याने चोपडा न्यायालयाच्या आवारातच पत्नीसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या कारणातून छातीत चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. त्यात आनंदा बिऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले असून ते चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
चेतन राजेंद्र सोनवणे व त्याची पत्नी शोभा राजेंद्र सोनवणे यांचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. चेतन हा शोभा हिला शिवीगाळ व मारत असल्यामुळे शोभा सोनवणे या अनेक दिवसांपासून मोहिदा ता चोपडा येथे माहेरी राहत होते. परंतु दि १९ मार्च रोजी चेतन सोनवणे याचा सासरे आनंदा बिऱ्हाडे यांना फोन आला आणि सांगितले की तुमच्या मुलीचे व माझे पटत नसल्याने आम्ही दोघे सहमतीने फारकती घेऊ त्यासाठी तुम्ही माझी पत्नी शोभा हिला उद्या म्हणजे दि २० रोजी चोपडा येथे घेऊन या.तेव्हा आनंदा बिऱ्हाडे व शोभा सोनवणे दि २० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चोपडा बस स्टँडवर आले. त्याठिकाणी चेतन हा पत्नी शोभा व सासरे आनंदा बिऱ्हाडे यांच्याशी वाद करू लागला तेव्हा आनंदा बिऱ्हाडे यांनी संगितले की,आपण कोर्टात भेटू व तिथे वाद मिटवू त्यानुसार चेतन हा कोर्टात आला.तिथेही चेतन वाद घालू लागला तेव्हा त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पत्नी शोभा व आनंदा बिऱ्हाडे पोलीस स्टेशनला जात असताना चेतन सोनवणे याने चोपडा न्यायालयाच्या आवारातच दुपारी १२ वाजेच्या सुमारास सासरे आनंदा बिऱ्हाडे यांच्यावर धारदार चाकूने छातीवर वार करत गंभीर दुखापत केली.त्यानंतर आनंदा बिऱ्हाडे व शोभा सोनवणे यांनी आरडाओरड केल्याने उपस्थित असलेले नागरिक व पोलीस यांनी चेतन सोनवणे यास घटनास्थळीच पकडले. त्यानंतर उपचारासाठी आनंदा बिऱ्हाडे यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेव्हाआरोपी चेतन सोनवणे याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला कलम ३२६,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहे.