जाणून घ्या.. श्रीगुरुचरित्राची महती; वाचनावेळी पाळायचे नियम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

हिंदू संस्कृतीमध्ये अध्यात्मिकता तसेच सण, व्रत वैकल्य यांना खूप महत्व आहे. आपल्या भारतामध्ये अनेक धार्मिक संप्रदाय आहेत. यात दत्तसंप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. यालाच अवधूत संप्रदाय असेही संबोधले जाते. दत्तात्रेय हे त्याचे आराध्य दैवत होय.

केशवतनय लिहितात, दत्तगोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्तभार्गव संवाद इ. दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून या शिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच श्रीगुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अत्यंत प्रिय आहे.

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड  यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे.  याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे.

तसेच श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे.

असे करावे या ग्रंथाचे पारायण

एखाद्या धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथाचे ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने, अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच `पारायण’ म्हणतात. पारायण नेहमी निष्काम असावे. परमेश्वराची उपासना नेहमी निष्काम भावनेने करावी. कारण भोग संपवण्यासाठी, कमी करण्यासाठी पारायण करू नये. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पारायणामुळे भोग संपवण्याची ऊर्जा मिळते. म्हणून साधकाने निष्काम मनाने पारायण कराव़े

गुरुचरित्र वाचनाच्या चार पद्धती 

काही दत्तभक्त रोज ठराविक ओव्या म्हणजे ५१ किंवा १०० ओव्या वाचतात. काही जण वेळेअभावी फक्त पाच ओव्या वाचतात. काही जण वर्षातून एकदाच पारायण करतात. हे पारायण एक दिवसाचे, तीन दिवसांचे किंवा सात दिवसांचे करण्याची पद्धत आहे. यापैकी एक दिवसाचे पारायण करू नये. कारण त्यासाठी तब्बल १४-१५ तास लागतात आणि सहाजिकच एवढा वेळ एका अवस्थेत मांडी घालून बसणे, यासाठी मनाची एकाग्रता साधली जात नाही. परिणामी हेतू साध्य होत नाही. तीन दिवसांच्या पारायणात पहिल्या दिवशी ज्ञानकांड, दुसऱ्या दिवशी कर्मकांड आणि तिसऱ्या दिवशी भक्तिकांड  अशी विभागणी केलेली असते. सप्ताह म्हणजे सात दिवसाचे पारायण सर्वच दृष्टीने सोयीचे ठरते. महिलांनीदेखील या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. सोयर, सुतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथवाचन करावे.

 पारायण करतांना ‘या’ नियमांचे पालन करावे 

–  वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा.

– यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

–  वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे.

–  वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा.

–  देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.

–  वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.

– वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, मध्येच कुणाशी बोलू नये.-. पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.

–  कायिक, वाचिक, मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे.

–  या सात दिवसांत दाढी करू नये. तसेच केस व नखे कापू नयेत.

–  पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण, परान्न कटाक्षाने टाळावे. एकभूक्त राहावे. सायंकाळी दूध प्यावे.

–  जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हाव़े.

–  समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा.

–  रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा.

–  रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी.

–  वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे.

–  एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने `यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो.’ असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा.

–  या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा, तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकिकत आली असेल, त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये. ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते, तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे.

–  स्त्रियांनीदेखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिर्भूत होऊन श्रीदत्तचरित्राचे पारायण करावे.

–  शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.