बुलडाणा : जागतिक महिला दिनानिमित्ताने 8 मार्च रोजी आरोग्य विभागाने महिलांचा विशेष सन्मान करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विभागाने कोविड लसीकरणाला येणाऱ्या महिलांकरीता विशेष केंद्रांची व्यवस्था केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने या केंद्रांवर शासनाच्या निकषांनुसार 60 वर्षावरील व 45 ते 59 वर्ष वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. तरी या संधीचा लाभ घेवून पात्र महिला लाभार्थ्यांनी मोठया प्रमाणावर लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
बुलडाणा तालुक्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष लसीकरण सत्र असणार आहे. तसेच चिखलीसाठी ग्रामीण रूग्णालय चिखली, दे. राजा तालुक्याकरीता ग्रामीण रूग्णालय दे. राजा, जळगांव जामोद तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मडाखेड, खामगांवसाठी सामान्य रूग्णालय खामगांव, लोणार तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुलतानूपर येथे विशेष लसीकरण सत्र असणार आहे.
मलकापूर तालुक्याकरीता उपजिल्हा रूग्णालय मलकापूर येथे, मेहकरसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांव, मोताळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी, नांदुरा तालुक्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा, शेगांव तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आडसूळ येथे, संग्रामपूर तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा आणि सिं. राजा तालुक्यासाठी ग्रामीण रूग्णालय सिं. राजा येथे महिलांना लसीकरणाचे सत्र असणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे यांनी कळविले आहे.