भुसावळ (उज्ज्वला बागूल) :- भुसावळ विधानसभा क्षैत्रात इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधण्यास सुरूवात केली आहे.विद्यमान आमदार यांनी मतदारसंघातील विकासकामांचे भुमिपुजनाच्या कामांचा तडाखा सुरू केला असून मतदारांच्या गाठीभेठीवर भर दिला आहे.मात्र,मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.प्रत्यक्षात मात्र जळगाव विधानसभा मतदार संघ माजी आमदार सुरेश जैन यांच्यासाठी शिवसेनेकडून मागणी होत असल्याने हा मतदार संघ शिवसेनेला सुटल्यास भुसावळ मतदार संघ पुन्हा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामूळे शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घालमेल सुरू आहे.
सन 2009 मध्ये भुसावळ विधानसभा मतदार संघ फेररचनेत हा मतदार संघ अनुसुचीत जातीसाठी राखीव झाला आहे.मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील वरणगाव व 22 गावे भुसावळ विधानसभा मतदार संघाला जोडली गेली.तर या रचनेत नशिराबाद भाग वेगळा झाला.यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपले विश्वासू संजय सावकारे यांना अनुसुचीत जाती या मतदार संघातून उमेदवारी देवून विजयी केले होते.तसेच त्यांना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यमंत्रीपदही मिळाले होते.मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीतून राज्यमंत्री आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश करून भाजपाकडून उमेदवारी मिळवली होती.तसेच त्यांनी या निवडणुकीतही आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय प्राप्त केला.यावेळी भाजपा- शिवसेनेची युती या मतदार संघामुळे तुटली होती अशीही चर्चा झाली होती.आता मात्र युती कायम झाली असल्याने हा मतदार संघावर शिवसेनेने आपला दावा सुरू केला असून हा मतदार संघ आपआपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.मात्र,जळगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे नेते आमदार सुरेश जैन यांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.यामूळे हा मतदार संघ शिवसेनेला मिळाल्यास भुसावळ विधानसभा मतदार संघ पुन्हा भाजपाच्या वाट्यावर येण्याची शक्यता आहे.त्यानुसार भाजपाने आपली रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.या पक्षाकडून संभ्रमाचे वातावरण- तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवाराबाबत सभ्रंमाचे वातावरण निर्माण झाले असून या पक्षामध्ये सद्यस्थितीत शांततेचे वातावरण दिसून येत आहे.तर नुकतेच संजय ब्राम्हणे यांनी भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात उमेदवारीसाठी आवश्यक तो निधी जमा केला आहे.यामूळे पीआरपीचे दावेदार जगन सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षातर्फे भुसावळ नगरपालीकेतील जनआधारचे गटनेता उल्हास पगारे , डॉ.राजेश मानवतकर , तर काँग्रेस पक्षातर्फे डॉ.सुवर्णा गाडेकर यांच्या नावाची तर शिवसेना-भाजप मित्रापक्षाकडून हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला येतो यासाठी प्रयत्न सुरू आहेत.तसेच हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यास शिवसेनेकडून उमेदवार कोण? याचीही चाचपणी सुरू असून सद्यस्थितीत प्रा.उत्तम सुरवाडे, पंचायत समितीचे सदस्य विजय सुरवाडे , गोकूळ बावीस्कर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.तर मध्यतंरी विद्यमान आमदार संजय सावकारे हे शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांना मातोश्रीवरून बोलावणे आले होते अशी चर्चा रंगली होती.यामूळे सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.