जळगाव लोकसभा मतदार संघाचा केंद्रबिंदू चाळीसगावच

0

दैनिक लोकशाहीचे भाकीत खरे ठरले

चाळीसगाव-
दैनिक लोकशाहीने 14 मार्च च्या राजकीय वार्तापत्र मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचा केंद्रबिंदू चाळीसगांव तालुका असेल, व विद्यमान खासदार ए टी नाना पाटील यांचा उमेदवारीचा पत्ता कट होईल असे भाकीत करण्यात आले होते ,आणि ते भाकीत तंतोतंत खरे होताना दिसत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या वाटणीतून राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेला आलेला मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादी पक्षाने चाळीसगाव तालुक्यातील पळासरे ही जन्मभूमि असलेले व व्यवसायानिमित्ताने जळगाव शहरात स्थायिक झालेले आणि जळगाव ग्रामीण मतदार संघ, धरणगाव तालुका एरंडोल तालुक्याचे राजकीय व सामाजिक दृष्ट्या प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी घोषित केली. देवकरांनी मतदार संघात आपल्या सर्व मित्र पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन जळगाव येथे भव्य असे शक्तिप्रदर्शन करून आपली उमेदवारी दाखल केली आहे.
भाजपाने विद्यमान खासदार ए टी नाना पाटील यांचा उमेदवारीचा पत्ता कट करून अमळनेरच्या विधानपरिषदेच्या आमदार व जळगाव जिल्हा भाजपाचे अध्यक्ष उदय वाघ यांच्या धर्मपत्नी स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर होताच खासदार नाना पाटील यांनी पारोळा येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले परंतु ए टी नाना पाटील यांच्या दबावतंत्राचा पक्षाच्या नेत्यांवर काहीच परिणाम झाला नाही. उलट नामदार महाजन यांनी,एटी नाना पाटील यांना स्वतंत्रपणे लढण्याचे आव्हान केले. परंतु महाजनांच्या या आवाहनामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातील बहुजन समाजाचे एकमेव नेते असलेले ए टी पाटील यांची भाजपने अशाप्रकारे कोंडी केली .आणि या कोंडीमुळे पाटील समाज हा भाजपापासून दूर जातो की काय ? आणि त्याचा परिणाम जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत निश्चितच दिसून येईल याची कल्पना आल्याने भाजपच्या नेतृत्वाने सुरुवातीपासून चाळीसगाव तालुक्याचे युवा आमदार उन्मेश पाटील यांचा नावाची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु आतातरी बहुजन समाज आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून पुन्हा आमदार उन्मेश पाटलांची भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. जेणेकरून बहुजन समाजाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गुलाबराव देवकर व उन्मेश पाटील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे व दहीवद या जिल्हा परिषद गटातीलच आहेत गुलाबराव देवकर यांचे गाव पळासरे तर उमेश पाटील यांचे गाव दरेगाव आहे.

आ. उमेश पाटील यांच्या कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी
आज सकाळपासूनच चाळीसगाव तालुक्यातील आमदार समर्थकांनी कार्यालयाजवळ गर्दी केली होती, आणि शेवटी संध्याकाळी उमेदवारी फिक्स झाली असे सांगत फटाक्यांची आतषबाजी केली सूत्रांच्या माहितीकडून असे कळते की उद्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटला दिवस आहे आणि आणि उद्या उमेश दादा पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करतील असे कळते.

Leave A Reply

Your email address will not be published.