जळगाव : रामानंदनगर परिसरातील रेशन दुकानदाराच्या गैरवर्तनाच्या तक्रारीनंतर जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली.
रामानंदनगर परिसरातील विमल बाळासाहेब गायकवाड यांच्या रेशन दुकानदाराच्या अनेक तक्रारी येत असल्याने तहसीलदार यांनी रेशन दुकानाची तपासणी केली होती. त्यांना तक्रारींची परिस्थिती याठिकाणी दिसून आली होती. त्यानुसार त्यांनी अहवाल सादर केला होता. या मध्ये तहसीलदार यांना संबंधित रेशन दुकानदार वेळेत धान्य वितरण करीत नाही, कमी प्रमाणात धान्य वाटप करतो, मद्यपान करून धान्य वाटप करतो तसेच महिलांशी उद्धटपणे बोलून, गैरवर्तन करतो यासह शासनाचे सर्व नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले होते. याबाबत वारंवार सूचना देऊन गायकवाड यांच्याकडून कुठलीही सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानाचे गायकवाड यांचे प्राधीकार पत्र रद्द करून ते किशोर प्रल्हाद पाटील यांना चालविण्यास द्यावे, असा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पुरवठा अधिकारी यांनी गायकवाड यांचे प्राधीकारपत्र रद्द करण्याचे आदेश काढले.
तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालानुसार पुरवठा अधिकारी यांनी (ता. 23) एप्रिलला विमल गायकवाड यांना नोटीस बजावून सुनावणी ठेवली होती. या सुनावणीला लेखी किंवा तोंडी म्हणणे मांडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. सुनावणीसाठी विमल गायकवाड यांचे पती बाळासाहेब गायकवाड हे उपस्थित होते. त्यांनी नोटिशीबाबत कुठलाही खुलासा सादर केला नसून त्यांच्यावरील दोषांबाबत ते समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गायकवाड यांचे प्राधीकारपत्र रद्द करून ही कारवाई केली.