जळगाव – एअर डेक्कन कंपनीतर्फे डिसेंबर २०१६ मध्ये सुरू झालेली जळगाव- मुंबई विमानसेवा काही महिन्यातच खंडित पडल्यानंतर सुमारे सव्वा वर्षांपासून बंद झालेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी हैद्राबादच्या ‘ट्रू जेट’ या कंपनीतर्फे १ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, ही विमानसेवाही दुपारच्याच वेळात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकारांना दुपारनंतरच प्रवास करावा लागणार आहे.
गेल्या डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘उडान’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात एअर डेक्कन कंपनीतर्फे सुरू झालेली जळगाव- मुंबई विमानसेवा काही महिन्यातच खंडित पडल्यानंतर सुमारे सव्वा वर्षांपासून बंद झालेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रू जेट कंपनीला जळगाव- मुंबई ही ‘उडान’ पहिल्या टप्प्यातील तसेच तिसऱ्या टप्प्यात अमदाबाद- जळगाव या दोन सेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे
ही विमानसेवा येत्या १ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन ट्रू जेट कंपनीकडून सुरू असून त्यासाठी जळगाव, अमदाबाद व मुंबई या तिन्ही विमानतळांशी संपर्क साधून त्यांच्या परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू अाहे. त्याचप्रमाणे नागरी उड्डयन मंत्रालयाकडेही परवानगी मागण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. यात जळगाव विमानतळावर विमान ट्रॅफिक नसल्याने विमानसेवेसाठी काेणताही वेळ देणे शक्य अाहे. अमदाबाद विमानतळावर मुंबई विमानतळा एवढा एअर ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर नाही; परंतु मुंबई विमानतळाच्या टाइम स्लाॅटची अवस्था अत्यंत बिकट अाहे. त्यामुळे दुपारूनच विमानसेवा सुरू राहणार आहे.