मनपा निवडणुकीत युती होण्याचे संकेत ; नेते मुंबईत ठाण मांडून
जळगाव ;- जळगाव शहर महापालिकेसाठी युती करण्याचे प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना दिली . त्यामुळे मनपा निवडणुकीत युती होण्याचे संकेत मिळाले असून यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईत ठाण मांडून आहेत . दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुरेशदादा जैन , नितीन लड्ढा यांनी दुपारी घेतली . यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन , आ. चंदुलाल पटेल उपस्थित होते .
राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव शहर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे . महापालिकेवर माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे वर्चस्व असून गेल्या अनेक वर्षांपासून सुरेशदादांची एकहाती सत्ता आहे . नुकतेच मनसेचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह १२ नगरसेवकांनी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्याचा निर्णय परवा जाहीर केला . त्यामुळे खाविआचे बळ वाढले आहे . तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहे . त्यामुळे मनपा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात मनपा निवडणूक लढली जाईल अशी दाट शक्यता आहे . काल मुंबईत सुरेशदादा जैन , नितीन लड्ढा हे रवाना झाले होते . शुक्रवारी सुरेशदादांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली . लवकरच युतीसंदर्भात संकेत मिळाले आहे . त्यामुळे निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत आहे .
आज उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता
सुरेशदादा जैन हे युतीसंदर्भात मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे . अर्थात उध्दव ठाकरे यांनी मनपा निवडणुकीचे अधिकार सुरेशदादांना दिले असून खाविआवर निवडणूक लढणार कि शिवसेचेच्या धनुष्यबाणावर लढणार याचा संभ्रम कायम असून लवकरच याचाही निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे ,.