सहकारराज्यमंत्र्यानी अधिकार्याना धरले धारेवर ; कामे होत नसल्याची ग्रामपंचायत सदस्यांकडून तक्रारी
जळगाव;-
जळगाव पंचायत समितीच्या अंतर्गत येणारी विविध प्रलंबित विकासकामे वेळीच मार्गी लावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा आज सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आढावा बैठकीत दिला. यावेळी रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे चार दिवसात न बुजविल्यास संबंधित अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकेल असा इशारा ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी सहकारराज्यमंत्र्यानी विविध विकासकामांचा आढावा जाणून घेत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या
. गुरुवार ३० रोजी जळगाव पंचायत समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन दुपारी एक वाजता करण्यात आले होते . यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,अतिरिक्त सीईओ संजय म्हसकर,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,जळगावचे तहसीलदार अमोल पाटील ,धरणगावचे तहसीलदार श्री. राजपूत अतिरिक्त बीडीओ मंजुश्री गायकवाड, यांच्यासह पंचायत समिती सदस्य ,अधिकारी,ग्रामपंचायतींचे सरपंच ,ग्रामसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रलंबित
धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांचे काम प्रलंबित असून निविदा निघूनही काही ठिकाणी रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नसल्याच्या तक्रारी सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या . त्यानुसार ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक गावनिहाय आढावा घेतला . यात एरंडोल ते म्हसावद रस्ता , आमोद ते कानळदा , धरणगाव उड्डाण पूल तसेच मुसळी ते धरणगाव ३५ कोटींच्या कामांचे काय झाले असा सवाल राज्यमंत्र्यानी उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी दिवाळीपर्यंत कामे पूर्णत्वास लावण्याचे आश्वासन दिले. अंजन विहिरा ते खामखेडा रस्त्यांच्या कामाला २ कोटी ६० लाखांच्या कमला मंजुरी मिळाल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. तसेच म्हसराला ते खामखेडा १ कोटी ३० लाख,आसोदा ते भोलाणे , ममुराबाद ते फुपनगरी,नांद्रा ते नांदगाव आदी कामे पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीला नगर पंचायत करण्यासंदर्भात ना. पाटील यांनी प्रश्न विचारून याचे काय झाले अशी विचारणा केली असता याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. यावेळी भादली शेळगाव रस्ता , देउळवाडे रस्त्याच्या कामना मंजुरी देण्यात आली आहे . तसेच मोहाडी येथे प्रस्तावित १०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच होणार असल्याची माहीत यावेळी देण्यात आली . दरम्यान आढावा बैठकीत विविध प्रलंबित विकासकामांचे प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले .