जळगाव जिल्ह्यात 12 हजार 854 बेडस् उपलब्ध

0

ऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या पोहोचली 1906 वर

जिल्हावासियांनो घाबरु नका, पण जागरुक राहून

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा

जळगाव : – कोरोना विषाणूचा फैलाव जगभर सुरु असतांना जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशापरिस्थितीत भविष्यात जिल्ह्यातील कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये याकरीता जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 854 बेडस् तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांची वेळेत तपासणी करुन वेळेत उपचारास प्राधान्य दिले जात आहे. आरोग्य यंत्रणेचे अथक प्रयत्न व जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही जिल्ह्याच्यादृष्टिने समाधानाची बाब आहे. अशा परिस्थितीतही बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे याकरीता जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये 8303 बेड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 984, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 1040 बेड तयार करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यात ऑक्सिजनयुक्त 1643 बेड तर 263 आयसीयु बेड तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 पेक्षा अधिक ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आल्याने जळगावचा हा पॅटर्न देशभर नावाजला गेला आहे. सर्वांच्या सहकार्यातून यापूर्वी जिल्ह्यात 1578 ऑक्सिजनयुक्त तर 210 आयसीयु बेड उपलब्ध होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सामाजिक संस्थांना केलेल्या आवाहनास उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला असून आता यामध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1643 ऑक्सिजनयुक्त तर 263 इतके आयसीयु बेड तयार झाले आहे. त्यामुळे यापुढे बेडअभावी कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत (2 सप्टेंबर) 28933 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 20830 म्हणजेच 71.99 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर सध्या जिल्ह्यात 7272 इतक्या ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 3133 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 524, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 632 इतके रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 2983 रुग्ण हे गृह विलगीकरणात उपचार घेत असून 547 रुग्ण ऑक्सिजन वायूवर असून 165 रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये अवघे 1156 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत तर 6116 एवढे रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याला नागरीकांनी साथ आवश्यक असून जिल्हावासियांनी कोरोनाची लक्षणे जाणवताच कोरोना चाचणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये चांगल्याप्रकारच्या आरोग्य व इतर सुविधा उपलब्ध असल्याने कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांना गृह विलगीकरणात राहूनही उपचार घेता येत असल्याने कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही पण जागरुक राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

00000

Leave A Reply

Your email address will not be published.