जळगाव :- गेल्या १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जळगावसह पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, यावलसह काही तालुक्यात काल रात्री हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणराया पावला असून पाचोरा तालुक्यात रात्री तासभर पावसाच्या सरी बरसल्या. भडगाव व चाळीसगाव तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जामनेर तालुक्यातील वाकोद, रोटवद परिसरात दमदार पाऊस झाला. यावल तालुक्यात रात्री १०.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अमळनेर, चोपडा व पारोळा तालुक्यातही रात्री सरी बरसल्या. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेत आहे.
दरम्यान, २१ ते २४ जुलै या काळात मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला. सध्या महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागापासून ते केरळ किनाऱ्यापर्यंत मान्सूनचा एक आस असून राज्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती आहे, असाही अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.