जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणाचे नियम पुन्हा कठोर केले आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ अथवा अन्य आजार असलेल्या नागरिकांना गृहविलगीकरणाची परवानगी नसेल.
गृहविलगीकरणाची मान्यता अपवादात्मक स्थितीत, लक्षणे नसलेल्या व अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच मिळू शकेल. त्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील. हे निकष पूर्ण केले जात नसतील तर प्रत्येक रुग्णाने कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे आहे.
गृह विलगीकरणासाठीचे नियम
– लक्षणे सौम्य, अतिसौम्य असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे
– विहित नमुन्यात रुग्णाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या नावाचा उल्लेख असावा
– संबंधित रुग्णाच्या घरी एकच कुटुंब असावे
– गृहविलगीकरणात दोन स्वतंत्र शौचालय, बाथरुमसह चार खोल्यांचे घर असावे
– घरी रात्रंदिवस, २४ तास काळजी घेणारी व्यक्ती असावी
– या सर्व सुविधा आहेत की नाही, याची खातरजमा तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिका व मनपा स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांनी करावी
– गृहविलगीकरणासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरचे प्रमाणपत्र व संबंधित भागातील अधिकाऱ्याचे हमीपत्र असावे