जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या 94 हजार 782 रुग्णांपैकी 81 हजार 429 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात 11 हजार 656 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 697 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.91 टक्के आहे, तर मृत्युदर 1.79 टक्के इतका खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साळळी खंडित करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या संशयितांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 6 लाख 82 हजार 918 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 94 हजार 782 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 5 लाख 86 हजार 144 अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या अवघे 556 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात 7 हजार 788 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 514 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 11 हजार 656 रुग्णांपैकी 9 हजार 18 रुग्ण लक्षणे नसलेले तर 2 हजार 638 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.