जळगाव जिल्ह्यातील पाच मार्गांवर होणार ,सात ठिकाणी टोलवसुली

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव – जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांवरील दोन्ही टप्प्यांसह राज्य महामार्गांचे काम येत्या काही महिन्यांत जवळपास पूर्ण होणार आहे. अशा तीन-चार रस्त्यांवर तब्बल सात ठिकाणी टोलनाकेअसतील, अशी व्यवस्था आहे. पैकी नशिराबादजवळील टोल सुरू झाला असून येत्या काही महिन्यांत अन्य नाक्यांवर टोल वसुलीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच- सात वर्षांत राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. पैकी काही कामे पूर्णही झाली असून काही रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे आहे.

अशी आहेत कामे

यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळे- जळगाव या टप्प्यात फागणे ते तरसोद व जळगाव- मलकापूर टप्प्यात तरसोद ते चिखली अशा दोन टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पैकी तरसोद- चिखली टप्प्यातील काम पूर्ण होऊन नशिराबादजवळ टोलनाके सुरू झाले व टोल वसुलीची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

फागणे- तरसोद टप्प्यातील काम अद्याप निम्मे अपूर्ण असून येत्या वर्षभरात ते पूर्ण होणार आहे. औरंगाबाद- जळगाव या १५० किलोमीटर रस्त्याचे कामही ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहेत. जळगाव- पाचोरा- भडगाव- चाळीसगाव या रस्त्याचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण आहे. तर जामनेर- बोदवड- मुक्ताईनगर या राज्य महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. महामार्गावर वराड- मुसळी फाट्यापासून धरणगाव व पुढे धरणगाव- अमळनेर, अमळनेर- फागणे या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे.

सात ठिकाणी असतील नाके

या सर्व रस्त्यांवर येणाऱ्या काळात टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे. पैकी महामार्गावर नशिराबादजवळ चौपदरी रस्त्याचा टोलनाका सुरू झाला आहे. फागणे- तरसोद टप्प्याचे काम पूर्ण होऊन त्या रस्त्यासाठी एक, औरंगाबाद- जळगावया चौपदरी काँक्रीटच्या रस्त्यासाठी दोन ठिकाणी टोल असेल. जामनेर- बोदवड- मुक्ताईनगर रस्त्यासाठी एका ठिकाणी, जळगाव- चाळीसगाव दरम्यान एका ठिकाणी टोलनाका उभारण्यात येणार आहे. तर धरणगाव- अमळनेर व अमळनेर- फागणे मार्गासाठी एका ठिकाणी टोलनाका असेल.

असे जिल्ह्यातच सात ठिकाणी नाके असतील. उर्वरित पाच ठिकाणी नजीकच्या काळात व फागणे- तरसोद टप्प्यावर काम पूर्ण झाल्यावर नाका सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here