जळगाव – राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असतांनाच जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात पारोळा, एरंडोल, चोपडा, भडगाव, अमळनेरसह आदि तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळले असून लोकांचे नुकसान झाले आहे. रात्री सुरु झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांना फटका बसला.
चोपडा तालुक्यात वादळी वार्यासह पाऊस
चोपडा । तालुक्यात रविवारी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस झाला. त्यात लासूर येथे जवळपास अर्धा तास पाऊस झाला. तर परिसरात रुखनखेडे, नारोद, खरद, बोरखेडा, माचला, वर्डी, मंगरूळ चौगाव, चुंचाळे, अकुलखेडा, आडगाव, विरवाडे, अडावद, वराड, या गावांना जोरदार वादळाचा तडाखा बसला असून यामुळे शेतातील पिकाचे, घरावरील व गुरांच्या गोठ्याची पन्हाळी पत्रे उडाली आहे. यावेळी जोरदार विजांचा कडकडाट होऊन मराठे येथे वीज पडून एक जण गंभीर जखमी होऊन भाजला गेला असून, त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एरंडोलमध्ये वादळासह पाऊस
एरंडोल । शहरात सकाळपासून ढगाळ वातारण होते. रात्री 9.30 वाजेदरम्यान अचानक वादळाला सुरुवात झाल्यानंतर पावसाने हजेरी १० ते १५ मिनिट हजेरी लावली. रात्री अचानक जोरदार वादळाला सुरुवात होवून पावसाने हजेरी लावली. वादळ व अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उळाली.
पारोळ्यात वादळी पाऊस
पारोळा । येथे रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून वादळ व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून लिंबू, डाळिंब, कांदा, आंबा पिकांना फटका बसला आहे. दरवर्षी सप्तशृंगी गड धुण्यासाठी चावदसला पाऊस येतो म्हणून हा पाऊस येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अमळनेरमध्ये पावसाचा शिडकावा
अमळनेर । शहरासह तालुक्यातील सांयकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही भागात रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाच्या पावसाचा शिडकावा पडला. रात्री 9 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ सुरु होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.