जळगाव: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. तेव्हा जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे, असा आत्मविश्वास एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते मंगळवारी चाळीसगावमधील सभेत बोलत होते.
संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा, इथे जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. यावेळी भाजपमधील खडसे यांच्या डझनभर समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा तेराव्या दिवशी जळगाव जिल्हयातील चाळीसगावमध्ये पोचली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सुचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.