जळगाव :- एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी बुधवारी रात्री केला. एटीएम केंद्रातील चाेख सुरक्षा यंत्रणेमुळे चाेरट्यांनी एटीएमची वायर कापताच बँकेच्या मुंबई कार्यालयात सायरन वाजला. त्यानंतर तात्काळ मुंबई येथून फाेनवरुन एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात अाली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटाच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. दरम्यान, दोन चोरट्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले असून त्यांचा शाेध घेतला जात अााहे.
एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्र बाहेर बुधवारी रात्री १ वाजून २० मिनिटांची एटीएमच्या एक चारचाकी उभी राहिली. त्यातून जवळपास पाच ते सहा चोरटे खाली उतरले. रेनकोट परिधान केलेला एक चोरटा एटीएममध्ये गेला. काही सेकंदात तो बाहेर निघून गेला. त्यानंतर १ वाजून ३१ मिनिटांनी दुसरा एक चोरटा चेहऱ्याला रुमाल बांधून, जैकेट, ग्लोज घालून आत शिरला. या चोरट्याने एटीएम केंद्रातील एक केबल कटरच्या साह्याने कापली. ही केबल कापताच एचडीएफसी बँकेच्या मुंबई कार्यालयात अलर्ट अलार्म (सायरन) वाजला. अलार्म वाजल्यानंतर काही वेळेतच बँकेच्या मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन करुन माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांना निरोप मिळाल्यानंतर ते अवघ्या १० मिनिटात पथकासह एटीएम केंद्राकडे धाव घेतली. सुरक्षा यंत्रणेमुळे बँकेच्या अद्ययावत एटीएम केंद्रातील लाखो रुपयांची रोकड सुरक्षीत राहिली. रात्रीतून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना ही माहिती देण्यात आली. तसेच महामार्गांवर नाकाबंदी करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.