जळगाव :- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, दोन ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. इंद्रप्रस्थनगर व प्रजापतनगर या दोन भागात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे साेमवारी उघडकीस आले. शहरात पोलिसांचा धाक संपला असून, सातत्याने एकाच परिसरात चोरटे धुमाकूळ माजवत आहेत. त्यामुळे पोलिसांची रात्रीची गस्ती होत आहे की नाही? हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.
शिवाजीनगर परिसरातील इंद्रप्रस्थनगरात मनोज पुंडलिक तिळवणे हे आई सिंधुबाई, पत्नी मंगला, मुले सुशांत व पीयूष यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते बांभोरी येथील खासगी कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीला आहेत. १७ ऑगस्ट रोजी सर्व कुटुंबीय रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी बऱ्हाणपूर येथे गेले. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गावाहून परतले. या वेळी त्यांच्या घराच्या मेन लोखंडी गेटचे कुलूप उघडल्यावर आतील दरवाजाचा कडीकोयंडा कापलेला दिसला. घरात पाहणी केली असता कपाट, पलंगातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. चोरट्यांनी गेटवरून उडी मारून प्रवेश करत घरातून अडीच तोळे सोने व ४० हजार रुपये रोख असा दीड लाखांचा एेवज लांबवला. नवीन घर घेण्यासाठी त्यांनी पैसे जमवले होते, त्यातच कंपनीत चार ते पाच महिन्यांपासून पगार होत नसल्याने या घटनेमुळे आर्थिक संकट ओढवले असल्याचे मनोज तिळवणे यांनी सांगितले. तिळवणे यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अंगणात शौच करून पोबारा केला. दरम्यान, कुंपणात एक प्लास्टिकची बॅटरी सापडली असून, ती चोरट्यांची असल्याचा अंदाज आहे. या परिसरात महापालिकेचे पथदिवे बंद असल्याने चोरट्यांचे फावत असून, पथदिवे सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत १० ठिकाणी घरफाेडी झाली अाहे. त्यामुळे पाेलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे अाहे.