जळगाव (रजनीकांत पाटील) : शहरात करोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असल्याने सरकारने नवीन आदेश काढत काही निर्बंध शिथिल केले असल्याने बाजारपेठेत खरेदी साठी गर्दी उसळली आहे. त्यामळे नागरिकांच्या मनातली भीती नाहीशी झाली की, काय असं वाटायला लागले आहे.
प्रशासनाच्या कडक अंमलबजावणी मुळे मे महिन्याच्या अखेरीस वाढत्या रुग्ण संख्येला बऱ्याच प्रमाणात आळा बसला, रुग्ण संख्येत घट होऊ लागली असतांनाच शहरातील बाजारपेठेत भाजी खरेदी व अन्य समान खरेदीसाठी उसळलेल्या गर्दी पाहून नागरिकांत कोरोनाची भीती संपली की काय असे वाटायला लागले आहे. अशीच गर्दी नेहमीच्या राहिली तर पुन्हा डोकेदुखी ठरू शकते.
लॉकडाऊन व संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्याची नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी असे प्रशासनाला वाटते. सुरुवातीला सकाळी सात ते अकरा वाजे पर्यन्त जीवन आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याची वेळ होती आता मात्र अनलॉक झाल्यामुळे दुपारी दोन पर्यन्त वेळ झाला असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन कोरोनापासून बचाव करण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेत आहे. भविष्यात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आजही आहे.