जळगाव – राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगाव जिल्ह्यात विद्यापीठ निर्मितीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे ‘नाथाभाऊ, गिरीश महाजन, हरिभाऊंच्या पाठपुराव्यातून साकारत असलेल्या मेगारिचार्ज प्रकल्पाने जिल्ह्याचे भाग्य बदलेल,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भुसावळ येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व खासदार रक्षा खडसे यांनी साडेचार वर्षांत केलेल्या विकास कामासंदर्भात “समर्पण’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होते. मुख्यमंत्र्यांनी या वेळी रक्षा खडसे यांच्या कामाचे कौतुक केले.
मेगा रीचार्ज योजनेचा सहा हजार कोटींचा डीपीआर सादर करण्यात आला असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंजुरी देणार असून या योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याने या परीसराचा निश्चित कायापालट होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. तसेच वरणगाव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा प्रश्नही मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी येथे दिली.