जळगाव (प्रतिनीधी) : राज्य शासनाने ठरवून दिलेले राज्य शासनाच्या नियमाबाहेर जाऊन प्रशासन परवानगी देऊ शकत नाही. गेल्या ४ महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापार्यांच्या हितासाठी दि.५ ऑगस्टपासून शहरातील सर्व प्रमुख व्यापारी संकुल मंगळवार, गुरुवार, शनिवारी बंद ठेवून इतर ४ दिवस उघडी ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि व्यापार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जर या नियमानुसार व्यापारी संकुलात अधिक गर्दी होत असल्यास पुन्हा सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात येतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केला.
मनपाच्या दुसर्या माळ्यावर असलेल्या सभागृहात सोमवारी शहरातील सर्व व्यापारी संकुलातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. सभेच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे, मनपा आयुक्त सतिष कुळकर्णी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रशासनाकडून सर्व व्यापारी संकुलांना एकच नियमावली लागू राहील, सम, विषम पध्दतीने दुकाने उघडण्यात येतील, सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत दुकान उघडे ठेवता येतील, व्यापारी संकुलातील दुकाने दुकान क्रमांक सम, विषम पद्धतीने विभागून उघडता येतील असे काही पर्याय व्यापार्यांसमोर मांडले.
व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्यांकडून त्यावर सूचना मागविल्या. बैठकीत झालेल्या नियमाचे अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात येणार असून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. १५ ऑगस्टपर्यंत बैठकीतील निर्णयानुसार दुकाने उघडण्यास मुभा असणार असून सर्व सुरळीत राहिल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
व्यापार्यांनी मांडल्या सूचना
बैठकीमध्ये व्यापार्यांनी सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने उघडी शनिवार, रविवार पूर्णतः बंद, दाणाबाजार आणि भाजीपाला देखील बंद ठेवावा, एखाद्या वेळी व्यापार्याकडून चूक झाल्यास दुकानाला सील न लावता जागेवरच दंडात्मक कारवाई करावी, दुकानात ५ व्यक्ती किंवा ५ ग्राहक संकल्पना स्पष्ट करावी, हॉकर्सवर कारवाई करावी, व्यापारी संकुलांना लावलेले पत्रे उघडावे, संपूर्ण मार्केट एक दिवस उघडावे, एक दिवस बंद ठेवावे, दुकानांची वेळ कमी करा परंतु सर्व एकाच वेळी उघडण्यास परवानगी द्या अशा सूचना मांडल्या.
व्यापार्यांकडून सहकार्याची अपेक्षा : महापौर
व्यापार्यांची अडचण आम्हाला समजते परंतु स्वतःची आणि शहराची काळजी घेणे आपल्याच हातात आहे. व्यापार्यांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. दुकानात सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, मास्कचा उपयोग करावा, गर्दी टाळावी, जो व्यक्ती मास्क आणि नियमांचे पालन करणार नाही त्याला सामान देऊ नये, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले.