जळगावमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; तरुण गंभीर जखमी
जळगाव : मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या योगेश ज्ञानेश्वर सोनवणे (वय ३१, रहिवासी – वाल्मिक नगर) या तरुणावर टोळीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धास्तीजनक घटना सोमवार, दि. ११ रोजी रात्री साडेदहा वाजता वाल्मिक नगर परिसरात घडली. या हल्ल्यात योगेशच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सोनवणे हा वाल्मिक नगरातील रहिवासी असून त्याचे गेल्या दोन महिन्यांपूर्वी हेमंत रायसिंगे याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दि. ११ रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून घरी परतत असताना योगेशला त्याचा मित्र शुभम सपकाहे याचा फोन आला. यावेळी त्याला बाळू रायसिंगे, हेमंत रायसिंगे, सागर आणि रोहीत यांनी शिवीगाळ करून त्याच्या घराजवळ येण्यास सांगितले. भांडण सोडवण्याच्या हेतूने योगेश त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हाच बाळू रायसिंगे याने त्याला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली.
मारहाणीत धीरज रायसिंगे याने धारदार शस्त्राने योगेशच्या गळ्यावर वार केला, तर सागर तायडे याने त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाल्याने तो रस्त्यावर पडला. परिसरातील नागरिकांनी त्याला मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
योगेश सोनवणे याच्या तक्रारीवरून बाळू प्रल्हाद रायसिंगे, रोहीत बाळू रायसिंगे, हेमंत प्रल्हाद रायसिंगे, सागर सुकलाल तायडे, धीरज बाळू रायसिंगे यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात दंगलीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास सुरू आहे.


