जळगावतून आ.स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

1

विद्यमान खा.ए.टी.नाना पाटील यांचे तिकीट कापून स्मिता उदय वाघ यांना संधी

जळगाव : लोकसभा निवडणूक २०१९ साठी जळगाव मतदार संघातून आ.स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली. रात्री 1.35 वाजता भाजपकडून उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात स्मिता वाघ यांच्या नावाचा समावेश आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता. तो आता दूर झाला असून भाजपाने विद्यमान खा.ए.टी.नाना पाटील यांचे तिकीट कापून याठिकाणी स्मिता उदय वाघ यांना संधी दिली आहे.

उमेदवारीसाठी सुरु होती रस्सीखेच
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उत्सुकता संपून उमेदवार कोण? याबाबत उत्सूकता लागलेली होती. भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील यांची नावे चर्चेत होती. पक्षातील वेगवेगळ्या वरिष्ठ नेते मंडळींकडून यातील काही जणांसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, दिल्लीचे श्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. अखेर रात्री उशिरा भाजपाने जळगाव मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

भाजपाने रात्री 35 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्रामधील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जळगाव येथून स्मिता उदय वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपाने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.

 

1 Comment
  1. Mangesh patil says

    ए टी नाना राहिले असते तर फाइट झाली असती आता देवकर आप्पा एकतर्फी विजयी होतील

Leave A Reply

Your email address will not be published.