जळगावच्या गाळेधारकांनी मुंबईला घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0

मंत्री ना.गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल, आ.शिरीष चौधरी उपस्थित
जळगाव, दि.२२ –
शहरातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या समितीने गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल, आ.शिरीष चौधरी उपस्थित होते.
जळगाव शहरातील मनपाच्या मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या कराराची मुदत संपलेली असल्याने गाळ्यांच्या ई-लिलाव करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली गाळेधारकांच्या समितीने दि.२० पासून आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आ.सुरेश भोळे यांनी सोमवारी अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये गाळेधारकांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले होते. आ.भोळे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील चर्चा केली होती.
गुरुवारी जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली आ.सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल, आ.शिरीष चौधरी यांच्यासह गाळेधारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गाळेधारकांचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.