जळगाव :– मे महिन्यातील अखेरच्या दिवसांमध्ये उष्णतेच्या तडाख्यामुळे जळगावकरांसह जिल्हावासीय बेजार झाले आहेत. गुरुवारी (दि.३०) जळगावचा तापमान पारा ४५ अंश इतके नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ३१ मेपासून ते २ जूनपर्यंत उष्णेच्या लाटीचा इशारा देण्यात आल्याने जूनचा पहिला आठवडादेखील जळगावकरांसाठी घामाघूम करणारा ठरणार आहे.
आठवडाभरापासून जळगावकरांना ”मे हिट” चा तडाखा जाणवत आहे. तसेच विदर्भात उष्णतेची लाट असून चंद्रपूरचा तापमानाचा पारा ४८ अंशावर गेल्याने खानदेशात याचा परिणाम दिसू लागला आहे. तीन-चार दिवसांपासून तापमान ४३ अंश तसेच ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असून गरम हवा असल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील सर्वाधिक ‘हॉट’ दिवस म्हणून गुरुवारची नोंद झाल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी सात वाजेनंतरही ४२ अंश सेल्सिअस तापमान होते.