जळगाव | बंगालचा उपसागर किंवा अरबी महासागरातून आर्द्रतायुक्त हवा येत नसल्याने शुष्कता निर्माण होत आहे. त्यामुळे तापमान वाढण्याचे संकेत अाहेत. जिल्ह्यात २३ ते २८ एप्रिल दरम्यान, हिट व्हेव सदृश्य स्थिती राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान तापमान ४३ ते ४७ अंशांवर तापमान जाऊ शकते.
मार्च ते २१ जून या कालावधीत सुर्याचा विषवृत्त ते कर्कवृत्तापर्यंत (२३.५ अक्षांश) प्रवास होतो. २१ जून ते २२ सप्टेंबर हाच प्रवास उलट्या दिशेने होतो. या कालावधीत सूर्यकिरणे लंबरुप पडल्याने तापमान वाढते. त्यामुळे उत्तर उष्णकटिबंधीय पट्ट्यात तीव्र उन्हाळा जाणवतो. तापमानाने विषवृत्तावरील हवा वर जाते. त्या हवेचे संक्रमण उत्तरेकडे हवेच्या वरच्या भागातून सुरू होते. उत्तरेकडे जाताना हवा थंड होते. भारताच्या मध्यभागावर आल्यानंतर हवा थंड होऊन खाली येऊ लागते. याला सिकींग म्हणतात. खाली येताना तिचे तापमान वाढते. अशा हवेच्या ढगांची निर्मिती होऊ शकत नाही, आकाश निरभ्र राहते. त्यामुळे सुर्यकिरण विनाअडथळा थेट जमिनीपर्यंत पोहोचून तापमान वाढते.