जलयुक्त शिवार अभियानातील 222 गावे झाली जलयुक्त

0

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार साठी जिल्ह्याला 2 कोटी 16 लाख रुपयांचा निधी प्राप्त :

जलसंधारण विभागाचे सचिव शनिवारी जिल्हा दौर्‍यावर

जळगाव, दि. 24 –
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गावांची निवड करताना तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार टप्पा क्र. 2 मधील (सन 2016-17) जिल्ह्यातील सर्व 222 गावे जलयुक्त झाली आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक 26 गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी 20 गावांचा समावेश आहे. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्याला 2 कोटी 16 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत कृषि विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल विभागाचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, जलसंधारण (जिल्हा परिषद) विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नाईक, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी नारायणराव देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे यांचेसह भूजल सर्व्हेक्षण, कृषि विभाग व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत टप्पा 2 मध्ये जिल्ह्यातील 222 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये या अभियानातंर्गत विविध यंत्रणामार्फत 4856 कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 4843 कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आतापर्यंत 124 कोटी 76 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तर उर्वरित कामे वन विभागाच्या परवानगीअभावी प्रलंबित होती. आजच्या बैठकीत या कामांना वनविभागाच्यावतीने श्री. पगार यांनी मंजूरी दिली. त्याचबरोबर या बैठकीत सन 2017-18 ची मंजूर कामे, तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली कामे, निविदा पूर्ण झालेली, वर्क ऑर्डर दिलेली कामे, पूर्ण झालेल्या व प्रगतीत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच टप्पा क्र. 4 (सन 2018-19) मध्ये निवड करावयाच्या 238 गावांबाबत चर्चा करण्यात आली.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्याला 2 कोटी 16 लाख रुपयांचा निधी प्राप्त
राज्यात शाश्‍वत सिंचन वाढावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्याला 2 कोटी 16 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर व पारोळा या तालुक्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये, जळगाव, धरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ व एरंडोल या तालुक्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर चोपडा, रावेर, यावल या तालुक्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियान व गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्‍वत सिंचन वाढण्यासाठी या अभियानातंर्गत सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सर्व यंत्रणांच्या अधिकार्‍यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.